विविध करदात्यांना कर कायद्यातील फॉर्म भरण्यासाठी केंद्र सरकारने दिला मोठा दिलासा

News & Updates

विविध करदात्यांना कर कायद्यातील फॉर्म भरण्यासाठी केंद्र सरकारने दिला मोठा दिलासा 

M Y Team दिनांक २१ मे २०२१

करोना महामारी मुळे अनेक राज्यात लॉक डाऊन असल्याने हिशेब लिहिणे, करकपातीची माहिती गोळा करणे आयकराच्या विवरण पत्राची तयारी करणे, ई. कामे करणे कठीण झाले आहे. म्हणून, करदाते काळजीत होते. कामे वेळेवर न झाल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागते. आधीच व्यवसाय बंद असल्याने उत्पन्न कमी, त्यात दंडाचा मार या कात्रीत करदाते होते. परंतु, केंद्रीय प्रतक्ष कर मंडळाने या त्रासातून त्यांची सुटका केली आहे. या वेळी करदात्यांच्या अंत न पाहता, चार्टर्ड अकाऊंटन्ट संस्थेच्या मागणीला मान देत वेळेवर मुदत वाढ दिली आहे.

कोरोना महासाथीचे वाढते संकट लक्षात घेऊन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) दाखल करण्याच्या मुदतीत वाढ करून करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. याशिवाय विविध प्रकारच्या कर अनुपालनासाठीदेखील (टॅक्स कम्प्लायन्स) मुदतवाढ देण्यात आल्याचे ‘सीबीडीटी’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

वैयक्तिक करदात्यांना आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचे विवरणपत्र दाखल करण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. ऑडिटची गरज नसलेल्या वैयक्तिक करदात्यांना विवरणपत्र भरण्यासाठी दरवर्षी ३१ जुलैपर्यंतची मुदत असते. यंदा ती ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, ऑडिटची गरज असलेल्या कंपन्या वा संस्थांसाठी असे विवरणपत्र दाखल करण्याची मुदत एक महिन्याने वाढविण्यात आली आहे. अशा कंपन्या वा संस्थांना एरवी ३१ आॅक्टोबरपर्यंत असणारी मुदत आता ३० नोव्हेंबरपर्यंत असेल.

तसेच, दरवर्षी कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या फॉर्म १६ साठीची (वार्षिक उत्पन्नाचा दाखला) मुदत देखील एक महिन्याने वाढवून आता १५ जूनऐवजी १५ जुलै २०२१ करण्यात आली असल्याचे ‘सीबीडीटी’ने म्हटले आहे.

याशिवाय, ‘टॅक्स ऑडिट रिपोर्ट’ सादर करण्याची मुदत आता एक महिन्याने वाढवून ३१ ऑक्टोबर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, विविध वित्तीय संस्थांना ‘स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन’ (एसएफटी) सादर करण्यासाठी ३१ मे ऐवजी ३० जून २०२१ पर्यंतचा अवधी मिळणार आहे.

विलंबित किंवा सुधारित स्वरुपात प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची नवी मुदत आता ३१ जानेवारी २०२२ असेल.

कर अनुपालनासाठीची मुदतवाढ : एका दृष्टीक्षेपात

१) वैयक्तिक करदात्यांचे विवरणपत्र : ३० सप्टेंबर २०२१

२) कंपन्या वा संस्थांसाठीचे विवरणपत्र : ३० नोव्हेंबर २०२१

३) कर्मचाऱ्यांना फॉर्म १६ देण्याची मुदत : १५ जुलै २०२१

४) टॅक्स ऑडिट रिपोर्ट सादर करणे  : ३१ आॅक्टोबर २०२१

५) स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन : ३० जून २०२१

६) विलंबित किंवा सुधारित विवरणपत्र : ३१ जानेवारी २०२२

====  +  ====

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *