मोदींचा विश्वास-विकासाचा ध्यास लेखक विनायक आंबेकर

Opinion

मोदींचा विश्वास-विकासाचा ध्यास लेखक विनायक आंबेकर

मोदींनी भारताचे पंतप्रधानपद स्वीकारल्याला आज ७ वर्षे पूर्ण होत आहेत. मोदीनी या ७ वर्षात पंतप्रधान म्हणून घेतलेल्या निर्णयांचा आणि केलेल्या कामांचा तपशील आज अनेक लोक अनेक अंगांनी घेत आहेत. प्रशासकीय, राजनैतिक, आंतरराष्ट्रीय, संरक्षण विषयक, सामाजिक, समाज कल्याणकारी, शैक्षणीक, आरोग्य विषयक, महिला बाल कल्याणकारी, शेती विषयक अशा अनेक अंगांनी मोदीन्च्या कामाची माहिती दिली जाऊ शकते. मात्र मोदीनी सत्ता हाती घेतल्या पासून सर्वच क्षेत्रात आणि विशेष करून पायाभूत सुविधांच्या आणि सामाजिक कल्याणाच्या ( गरीब कल्याणाच्या ) क्षेत्रात अतीप्रचंड योजनांचे नियोजन आणि प्रारंभ केला आहे त्या विषयी थोडेसे.

मोदी सरकारने सत्ता मिळाल्या पासूनच सामान्यांच्या कल्पनेत बसणार नाहीत  असे पायाभूत सुविधा बांधकामांचे  प्रकल्प हाती घेतले. काही पूर्ण झाले असंख्य सुरु आहेत. महामार्ग, द्रुतगती महामार्ग, जलदगती फ्रेट वाहतुकीचे कोरीडोर, ड्राय पोर्ट, बंदराना जोडणारे रेल्वे मार्ग,  सामुद्रिक पूल, सागरी महामार्ग,मोठ्ठ्या शहरातील मेट्रो लाईन्स, बुलेट ट्रेन, आकर्षक सुधारणा केलेल्या रेल्वे स्टेशन वरून इंटरसिटी सेमी हाय स्पीड ट्रेन्स, डीप सी पोर्टस, होवरक्राफ्ट,  एअरपोर्टस, रेल्वे क्रोस्सिंग वरील ओव्हर व अंडर ब्रिज अशी लांबलचक लिस्ट आहे. दोन तीन वेळा सुरु होऊन बंद पडलेले मुंबईच्या ट्रान्सहार्बर लिंकचे काम अखेर सुरु झाले आहे. चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंचीचा रेल्वे पूल पूर्ण होत आलेला आहे. ब्रम्हपुत्रा सारख्या अवघड नदीवर पूल बांधले गेले आहेत. हिमालयातील दुर्गम भागातील अटल टनेल सारखे सर्व मोसमात टिकू शकतील असे बोगदे बांधले गेले आहेत. सीमेवरील निगराणी साठी ३५ पूल बांधले आहेत, द्रुत गतीच्या १.५ कि.मि. लांबीच्या माल वाहतुकीच्या रेल्वेची फ्रेट कोरीडोर वरील चाचणी यशस्वी झालेली आहे. दिल्ली मुंबई फ्रेट कोरीडोर बांधून पूर्ण होत आला असून मोठा भाग वाहतुकीला खुला झाला आहे शिवाय याच मार्गावरील ढोलेरा सारखे औद्योगिक शहर आकाराला येत आहे. गुजरात मधील गिफ्ट सिटी सारख्या टीकेचा धनी झालेल्या प्रकल्पात येणा-या कंपन्यांची यादी पाहिली तर हि अफाट भव्य कल्पना खरोखरच व्यवहार्य आहे हे सिद्ध झाले आहे. मोदीन्च्या मुळ नियोजनानुसार सर्व घडले असते तर या पैकी बहुतांश कामे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी ७५ वर्षापर्यंत पूर्ण झाली असती. कोरोना महामारीमुळे आता ती लांबली असली तरी बहुतांश कामे चांगल्या टप्प्यावर आली आहेत आणि इतके दिवस अशक्यप्राय वाटणारी अनेक कामे सुरु झाली आहेत.

सर्व सामान्यत: अकल्पनीय वाटणारी अशी भव्य स्वप्ने पहाणे आणि त्याला चिकाटीने पूर्ण करणे हेच मोदींच्या आत्मविश्वासाचे वेगळेपण आहे. त्यांनी सुरु केलेल्या अनेक योजनांची आवश्यकता आणि त्याचा भविष्य काळात मिळणारा फायदा अनेकांच्या लक्षात देखील येत नाही. पण ७० वर्षात व्हायला पाहिजे होत्या त्या गोष्टी झाल्या नाहीत आणि दरम्यानच्या काळात जग भारताच्या अनेक वर्षे पुढे निघून गेले. हि Time Gap म्हणजेच सरकारी भाषेत विकासाचा अनुशेष भरून काढुन भारताला जगाच्या बरोबरीने नेण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे असे मला वाटते. साधे उदाहरण घ्यायचे असेल तर जनधन बँकखात्यांचे घेता येईल. थोड्या काळात ४२  कोटी बँक खाती उघडणे हे अशक्य वाटले होतेच पण त्या मागचा हेतू सुरुवातीला अनेकांच्या लक्षात देखील आला नाही. हा वर्ग बर्याच अंशी सरकारी योजनांचा लाभार्थी आहे आणि त्यांची बँक खाती उघडल्याने त्यांच्या हातात सरकारी मदत थेट पोहोचवता आली. गेल्या ७ वर्षात सुमारे १३५ लाख कोटी एव्हढी प्रचंड रक्कम जनधन  योजने मुळे १००% थेट लाभार्थ्यांच्या हातात गेली.

या सारख्या भव्य पायाभूत सुविधांच्या बांधकामाबरोबरच सर्वसामान्य भारतीयांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील तसेच चांगले बदल घडवून आणण्याचे काम मोदींनी या बरोबरीनेच सुरु केले. जनधन योजनेद्वारा ४२  कोटी २५ लाख भारतीयांची बँक खाती, उज्वला योजने द्वारा ८ कोटी ३ लाख घरात एलपीजी वाटप, स्वच्छ भारत योजनेद्वारा ११ कोटी ३५ लाख खाजगी शौचालये, जन आरोग्य योजने द्वारे १ कोटी ७८ लाख नागरिकाना मोफत आरोग्य सेवा, १ कोटी ८६ लाख लोकाना आवास योजने द्वारे मोफत घरे, सौभाग्य योजनेद्वारे २ कोटी ६२ लाख घराना मोफत वीज, ३६ कोटी ७३ लाख एलीडी दिवे वाटप असे सर्वसामान्य भारतीयांचे जीवनमान उंचावणारे असे मोदीन्च्या अफाट कल्पनाशक्ती आणि आउट ऑफ बॉक्स विचार प्रणालीचा प्रत्यय देणारे काम मोदिनी पूर्ण केले आहे आणि या पुढेही चालू आहे. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या या देशात सर्वसामान्याना २०१४ पासून आज पर्यंत १५१ लाख कोटी रुपयांचे अनुदान एकही पैशाची अफरातफर न होता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात ट्रान्स्फर मिळाले आहे. १ कोटी ७० लाख शेतकरी ई नाम या इलेक्ट्रोनिक मार्केटचे नोंदलेले वापरकर्ते आहेत,  ११ कोटी १६ लाख शेतक-याना पीएम किसान सन्माननिधी योजने अंतर्गत थेट आर्थिक मदत मिळाली आहे, ८ कोटी ९४ लाख शेतक-याना फसल विमा योजनेचा लाभ, मुद्रा- stand up इंडिया, स्टार्ट अप इंडिया योजने मधून सुमारे २८ कोटी लोकाना व्यवसायासाठी कर्जे, सुरक्षा विमा योजने सारख्या योजनेद्वारे २३ कोटी २६ लाख लोकाना फक्त १२ रुपयात २ लाख रुपयांचा अपघात विमा कव्हर  अशा अकल्पनीय वाटणा-या समाज कल्याणकारी योजना ७० वर्षे दुर्लक्षित केलेल्या आर्थिक दुर्बल व मागासवर्गीय  समाजाला प्राथमिकता देऊन त्यांनी स्वत: कष्ट करून या योजना यशस्वी केल्या आहेत.

या सर्व कामा बरोबरच कोरोना महामारीच्या काळात गरीब कल्याण योजनेअंतर्गत दिलेली मोफत धान्य व पैशाची सुमारे १ लाख ९२ हजार कोटींची प्रत्यक्ष मदत आणि इमएसएमई सहित अनेक उद्योग धंद्यांना दिलेले ५ लाख कोटी रुपयांचे प्रत्यक्ष आर्थिक मदतीचे पेकेज आणि एकूण सुमारे २० लाख कोटी रुपयांचे अप्रत्यक्ष मदतीसाहितचे पेकेज याचाही विचार करावा लागेल. याशिवाय लसीकरण, नुकतेच ८० कोटी नागरिकाना दिलेले दोन महिन्याचे फुकट धान्य असे कोरोना वरील खर्च चालूच आहेत.

या सर्व भव्य कामकाजाची माहिती सर्व सामान्य जनते पर्यंत निश्चितच पोहोचली आहे हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. विशेषकरून महिला वर्गात मोदींच्या विषयी अत्यंत आपुलकीची भावना आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या काळात अचानकपणे समोर आलेल्या गरजा लगेच पूर्ण करता आल्या नाही म्हणून त्याना अनेक दुषणे दिली जातायत. मी या टीकेचे विश्लेषण वेगळ्या अंगाने करतो. एका अर्थाने हि टीका मोदींच्या विषयीचा जनतेचा विश्वास प्रगट करते. मोदी असताना आपलयाला काहीहि कमी पडणार नाही असा विश्वास जनतेच्या मनात आहे आणि त्यामुळेच त्या गोष्टी उशिरा मिळाल्या बद्दल टीका होत आहे. या पुढील काळात हा विश्वास मोदी सार्थ ठरवतील हे नक्कीच.

====  +  ====

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *